नाशिक : यंदा रंगपंचमीत जुने नाशिकसह पंचवटी या पारंपरिक परिसरात रंगोत्सवाला रंग बहरलेला बघायला मिळणार आहे. एकूण 6 पारंपरिक पेशवेकालीन रहाड तसेच सुमारे ११ ठिकाणी शॉवरने रंगाची उधळण होणार आहे. रंगपंचमी साठी शुक्रवारी (दि. २९) शहरासह उपनगराच्या बाजारपेठामध्ये विविध रंग आणि पिचकाऱ्यांच्या दुकानावर ग्राहकांनी आणि विशेषत्वे युवकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. जुने नाशिकसह पंचवटी परिसरात उत्साहात रंगपंचमी साजरी होत असल्याने तयारीला वेग आला आहे.
दरवर्षी तिवंधा चौक, काझीपूर, जुनी तांबट गल्ली, दिल्ली दरवाजा अशा चार ठिकाणी रहाड रंगोत्सव साजरा होत असतो. यंदा त्यात आणखी एका राहाडीची भर पडली आहे. मधली होळी परिसरात रहाड ही खुली करण्यात आली आहे. त्यामुळे जुने नाशिक परिसरातील पाच रहाड तर पंचवटीतील शनि चौकातील सहावी रहाड खुली झाल्याने तरुणाई मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे रंग प्रेमीना आणखी एक रहाड डुबण्यासाठी खुली झाली आहे.
हे ही वाचा : नाशिक मध्ये तब्बल सहा लाखांची वीज चोरी आले उघडकीस....
भद्रकाली पोलिस ठाण्यात रंगोत्सव साजरा करणाऱ्या १६, तर सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका मंडळाकडून नोंद करण्यात आली आहे.
राहाडीवरील रंगोत्सव ही अस्सल नाशिकची ओळख असली तरी गत चार-पाच वर्षा पासून रहाडीवर उड्या मारण्याचा आनंद लुटण्यास येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यात गतवर्षी तर तिवंधा चौकातील रहाडीवर दुपारच्या वेळेस चेंगराचेंगरीसदृश परिस्तिथी निर्माण झाली होती. त्यावेळी पोलिसाना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही काळ राहडच बंद करण्यासह गर्दीवरील नियंत्रणासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली होती.
हे ही वाचा : राजकीय पक्षातील इच्छुकांना मराठा समाजाकडून मनाई....
गतवर्षीचा अनुभव लक्षात घेऊन यंदा रहाडीवर जाणाऱ्या तरुणाईने कमी गर्दीच्या वेळीच जाण्यासह फार गर्दी असेल तर ती रहाड टाळून अन्यत्र जाण्याचा पर्याय निवडणे आवश्यक आहे. तसेच पोलिस यंत्रणेने देखील अधिक प्रमाणात बंदोबस्त तसेच गर्दीवर नियंत्रणासाठी पुरेशी सज्जता ठेवण्याची गरज सामाजिक कार्यकर्त्याकडून व्यक्त केली जात आहे.
तिवंढयतील रहाडीवर म्हसरूळ टेककडून असलेल्या उतराच्या रस्त्याने गर्दीचा दाब प्रचंड राहतो. त्यामुळेच गतवर्षीच तिथे चेंगराचेंगरीची परिस्तिथी निर्माण झाली होती. त्यात गर्दीला नियंत्रित करताना एका महिला पोलिस हवालदारास दुखपतही झाली होती. या रहाडी पूर्वीच्या कमी लोकसंखेच्या नाशिकच्या दृष्टीने बांधण्यात आल्या आहेत.